3.
मला विपीन दादाच्या पार्थिव देहाला गावी घेऊन जावे लागले. घरावर शोककळा पसरली होती. दादाला बाहेरच्या खोलीत झाकून ठेवले होते.
गार्गीची मामी आणि मामा खोटा कळवळा घेऊन आले आणि मामी आतल्या खोलीत जाऊन मोठ्या मोठ्याने रडू लागली. काकू आपल्या एकुलत्या एक मुलाला अस घालवून रडत होत्या तर वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी चार महीन्यांची गरोदर गार्गी सुन्न झाली होती.
सगळे पुरुष बाहेरच्या खोलीत चपापले जेव्हा गार्गीच्या मामीने अचानक ओरडायला सुरुवात केली.
काही कळायच्या आधीच गार्गीची मामी तिला तिच्या केसांना धरून बाहेर ओढत घेऊन आली आणि किंचाळून बोलू लागली.
“कैदाशिणे, अगं आपल्या आई बापाला खाऊन तुझे पोट भरले नाही का? आता स्वतःचा नवरा पण खल्लास! काय पाप केले होते ग त्याने? त्यांनी तर तुला काही न मागता पदरात घेतली!”
मामीने गार्गीला खाली विपीन दादाच्या जवळ फेकले आणि गार्गीच्या हातात दादाला झाकणारा कपडा आला. दादाच्या छिन्न विच्छिन्न देहाला बघून भल्याभल्यांची किंचाळी निसटली पण गार्गी स्तब्ध होऊन पडली. मी गार्गीच्या सफेद साडीला पडणारा डाग बघितला आणि तिला मिठीत घेत काकूंना बोलावले.
“काकू, डॉक्टरांना बोलवा!!… आता लगेच बोलवा!!…”
काकूंना सगळे समजले आणि त्यांनी गार्गीला मिठीत घेत डॉक्टरांना बोलावले. माझा राग अनावर झाला आणि मी मामा मामीच्या दिशेने गेलो.
सहा फुटांपेक्षा जास्त उंच सलग 5 वर्ष रोज दोन तास तरी केलेला व्यायाम आणि मूळच्या काळ्या रंगावर रागीट दिसणारे डोळे आता आग ओकित होते. माझा अवतार बघून पूर्ण गाव थबकले आणि मी मामा मामी समोर हात जोडले.
“गार्गी आता दामल्यांची सूनच नसून त्यांची मुलगी सुद्धा आहे. आपण तिची काय आणि कशी काळजी घेतली हे सगळ्यांनी बघितले आहे. तर आता आपला दामल्यांशी आणि गार्गीशी संबंध संपला. परत ह्या दारावर पाणी सुद्धा मागायला येऊ नका!”
मामा, “अरे तू कातकऱ्याचा टाकलेला आणि दामलेंचे उष्टे खाणारा काय म्हणून मला असं बोलू शकतो? तू स्वतःला समजतोस तरी कोण?”
दामले मास्तरांनी माझ्या खांद्यावर हात ठेवत, “माझा धाकटा मुलगा. ह्याच्या वडिलांचे नाव मी त्याला ठेवायला सांगितले कारण तो त्याचा भूतकाळ होता, दामले घराण्याचा धाकटा मुलगा हा त्याचा वर्तमान आहे आणि भविष्यात फक्त इतके सांगतो की त्यात तुमचा समावेश नाही. आता माझा मुलगा बोलला तसे चालते व्हा!”
विपीन ची शेवटची आठवण गेली. गार्गीचे बाळ गेले.
10 जुलै 2006
काकांनी मला घरी बोलावले होते. विपीन दादा गेला त्या दिवसा पासून गार्गी आज पर्यंत स्तब्ध होती. तिला सांगितले ते आणि तितकेच काम ती करत. प्रत्येक छोटे काम तिला करायला सांगावे लागत.
काका, “बाबू, गार्गीच्या मामीने तिला का पाडले हे आता कळत आहे. गार्गीला मुल झाले असते तर ती गार्गी दामले म्हणून स्वतंत्र राहू शकली असती. विपीन कामावर जाताना मारला गेला म्हणून सरकारी भरपाई चे 30 लाख गार्गी चे असले पाहिजे. त्याच बरोबर अनुकंपन तत्त्वावर सरकारी नोकरी. मामी आणि तिच्या पोराचा ह्याच गोष्टींवर डोळा आहे.”
मी, “पण काका, गार्गी वहिनीच्या ह्या अवस्थेत नोकरी?”
काका, “गावातले डॉक्टर वैद्य बोलले की गार्गी जर आनंदी राहिली तर ती बरी होऊ शकते. मामी ने कोर्टात आव्हान केले आहे की तिने गार्गीला लहानाचे मोठे केले आहे आणि इकडे तिची नीट काळजी घेतली जात नाही. त्या मुळे गार्गीची जवाबदारी, गार्गीच्या वाटणीची भरपाई आणि अनुकंपंतत्वावरील नोकरी अस सगळ तिला मिळावं. बाबू, अस झाल तर नोकरी मिळताच गार्गी चे बरे वाईट व्हायला वेळ लागणार नाही.”
मी, “काका, मी गार्गी वहिनी चे report मुंबईच्या डॉक्टरांना दाखवतो. त्यांच्या विरुद्ध आपण केस लढू.”
काका, “बाबू ते सगळं तर आपण करूया पण…”
काकू गार्गी वहिनीला घेऊन बाहेर येऊन बसल्या.
काका, “बाबू, मी जे म्हणणार आहे त्याला लगेच उत्तर देऊ नकोस. शांतपणे विचार करून मग आपण उद्या बोलू.
बाबू, माझे आणि काकुंचे आता वय होऊ लागले आहे. आम्हाला खरोखर गार्गी ची काळजी आता घेणे कठीण होऊ लागले आहे. त्याच बरोबर गार्गीचा चांगला उपचार मुंबईत होईल. म्हणून तू गार्गीला मुंबईत घेऊन जा.”
मी गार्गी वहिनी साठी लगेच तयार झालो तर काका पुढे बोलले,
“बाबू, जर केस चा निकाल आपल्या बाजूने पाहिजे असेल तर, गार्गीच्या भविष्यासाठी, गार्गीच्या सुरक्षे साठी, तुला तिच्याशी लग्न करावे लागेल.”
मी चमकून काकांकडे बघितले. त्यांच्या डोळ्यातला निर्धार बघून काकूंकडे बघितले. मला कळले की हा विचार काकूंचा आहे. मी गार्गी वहिनी कडे बघितले आणि माझे मन निराश झाले.
निस्तेज डोळ्यांची आणि मख्ख चेहऱ्याने बघणारी ही माझी गार्गी नव्हती. पण मी असे कसे करू शकतो?
मी, “काका, गार्गी वहिनी माझी वहिनी आहे. हे निषिद्ध आहे.”
काका, “मामा बोलले तसे तुला आम्ही कागदोपत्री दत्तक घेतले नाही म्हणून तसा तुम्हा दोघांच्यात काही संबंध नाही. तस पण एकदा विपीन गेला की धाकटा भाऊ म्हणून तुलाच हीची जवाबदारी घेतली पाहिजे. नको! आता काही बोलू नकोस. आपण उद्या सकाळी बोलू.”
रात्रीचे जेवण भयाण शांततेत पार पडले आणि मी दरवाज्याजवळ अंथरूण घेऊन झोपलो. गार्गी वहिनी चे आता चे रुप बघून मन विषण्ण झाले होते. हीच ती गाल फुगवणारी पाणीदार घाऱ्या डोळ्यांची गार्गी का? पण जर मी आज हीची साथ दिली नाही तर माझे प्रेम खरे तरी होते का?
सकाळी काकांनी नाश्ता करायला मला बोलावले आणि गार्गी वहिनी चहाचा ट्रे घेऊन आली. काकांनी तिला चहा द्यायला सांगितला आणि गार्गी वहिनीने दोघांना चहा दिला. काकूंनी गार्गीला शाबाशी देत बसायला सांगितले.
मी, “काका, मी गार्गी वहिनीला मुंबईला घेऊन जातो. तिकडे तिचा उपचार करून घेतो पण मला नाही वाटत की ती आता लग्नाला संमती देण्याच्या परिस्थितीत आहे.”
काकू, “जर गार्गीला सुरक्षित ठेवायचे असेल तर काही मार्ग काढलाच पाहिजे. ती अशी एखाद्या पूर्षाबरोबर राहणे पण चांगले दिसत नाहीच.”
आमचे बोलणे चालू होते आणि गार्गी वहिनी शांत बसली होती. काकूंनी सांगितले की गार्गीच्या पाळ्या नियमित असाव्या म्हणून तिला गर्भनिरोधक गोळ्या दिल्या जातात. गार्गीची पाळी काही दिवसांनी सुरू होईल आणि 20 तारखेला संपेल. मी गार्गीला 22 तारखेला घेऊन जाऊ शकतो.